'खजुराहो' येथील कामशिल्पांबद्दल जगभरातील पर्यटकांमध्ये विलक्षण कुतूहल आढळून येते. त्यामुळे प्रतिवर्षी जगभरातून हजारो पर्यटक खजुराहोला भेट देतात. राष्ट्रीय कामविज्ञान परिषदेच्या (National Sexology Conference) निमित्ताने मला खजुराहोला भेट देण्याची संधी मिळाली. मध्य प्रदेशाच्या उत्तर भागातील छत्तरपूर जिल्ह्यातील 'खजुराहो' हे छोटेसे गाव. तेथील कामशिल्पांमुळे जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आले आहे.
अजिंठा-वेरूळप्रमाणेच खजुराहोमध्येही लेणी असावीत, असा समज लोकांमध्ये आढळून येतो. मात्र खजुराहोमधील शिल्पाकृती या विविध मंदिराच्या बाह्यभिंतीवर कोरलेल्या आहेत. खजुराहो या छोट्याशा गावानजीक विस्तीर्ण अशा सपाट भूप्रदेशावर बांधलेली मंदिरे जगातील सर्वोत्कृष्ट स्थापत्यशास्त्राचा नमुना ठरली आहेत. मंदिराच्या स्थापत्य कलेपेक्षाही त्यांच्या दर्शनी भिंतीवर कोरलेली कामशिल्पे (Erotic Sculptures) संपूर्ण जगाचे लक्ष वेधण्यात यशस्वी ठरली आहेत. मंदिराच्या सर्व भिंतीवर असणार्या हजारो शिल्पाकृतींपैकी केवळ पाच टक्के शिल्पाकृती या कामशिल्पांच्या आहेत. परंतु या मोजक्या कामशिल्पांमुळेच खजुराहोची शिल्पकला ही 'कामशिल्पकला' म्हणून जगभर प्रसिध्द पावली आहे.
खजुराहोच्या या जगप्रसिध्द मंदिरांची निर्मिती ही चंदेला राजाच्या राजवटीत झाली. ही सर्व मंदिरे केवळ १०० वर्षाच्या कालावधीत (इ.स.९५० ते इ.स.१०५०) उभारली आहेत. आश्चर्य म्हणजे अशा ८५ मंदिरांची निर्मिती चंदेला राजांच्या राजवटीत झाली होती. त्यापैकी आज केवळ २२ मंदिरे काळाच्या ओघात शिल्लक राहिली आहेत. केवळ शंभर वर्षाच्या कालावधीत ८५ भव्य मंदिरांची निर्मिती हे आश्चर्यजनक आहे.
खजुराहोच्या जगप्रसिध्द मंदिरांचे निर्माण करणारे चंदेला राजे हे स्वत:ला चंद्रदेवाचे वंशज मानत. या चंदेला वंशाच्या उत्पत्तीची कथा मोठी रंजक आहे. या राजघराण्याचा आद्यपुरूष चंद्रवर्मन याचा जन्म चंद्र आणि वाराणसीच्या एका पुजार्याची कन्या हेमवती यांच्या मधुरमिलनातून झालेली आहे, अशी समजूत आहे. एकदा ती वनातील एका सरोवरात चांदण्या रात्री स्नान करीत असताना मनुष्यरूपात अवतीर्ण झालेला चंद्र तिच्याशी प्रणयक्रिडा करतो. त्यावेळी हेमवतीच्या शापाला भिऊन त्याने तिला वर दिला, तुला होणारा पुत्र क्षत्रिय वीर, उत्तम राज्यकर्ता होईल व त्यापासून होणारा राजवंश दीर्घकाल राज्य करेल. हा चंदेल वंश पुढे पाचशे वर्षे राज्यावर होता. चंद्रवर्मन राजाने त्यानंतर खजुराहोला मोठे यज्ञ केले. त्यानंतरच्या काळातील राजांनी सुमारे ८५ भव्य मंदिरांची उभारणी केली.
खजुराहोची सद्य:स्थितीतील २२ शिल्पमंदिरे तीन परिसरात विभागलेली आहेत. त्यातील पश्चिमेकडील शिल्पसमूह हा मोठा आहे. खजुराहो गावच्या पश्चिमेस असलेल्या या समूहात सध्या १२ शिल्पमंदिरे आहेत. या समूहात अग्रभागी लक्ष्मण मंदिर, पार्वती मंदिर व विश्वनाथ मंदिर ही मंदिरे आहेत. तर पाठीमागील रांगेत कंदारिया महादेव मंदिर, देवी जगदंबा मंदिर, चौसष्ठ योगिनी मंदिर व चित्रगुप्त मंदिर ही प्रमुख मंदिरे आहेत. या मंदिराच्या सभोवती छान हिरवळ असून विविध वृक्षवेलींचे संवर्धन केलेले आहे. त्यामुळे ही मंदिरे पाहताना मन प्रसन्न राहते.
पश्चिमेकडील मंदिर समुहात 'लक्ष्मण मंदिर' हे भव्य व आकर्षक मंदिर अग्रभागी स्थित आहे. गेल्या १००० वर्षात या मंदिराला नैसर्गिक उपद्रव न झाल्याने हे मंदिर अगदीच सुस्थितीत आहे. हे मंदिर यशावर्मन राजाने उभारलेले असून त्यांनी या मंदिरात विष्णूमूर्तीची स्थापना केली आहे. यशोवर्मनचे लक्ष्मणवर्मन असेही नाव असल्याने या मंदिरास पुढे लक्ष्मण मंदिर असे संबोधले जाऊ लागले. हे भव्य मंदिर इ.स. ९३० ते ९५० या कालखंडात उभारलेले आहे. या मंदिरास ११ पायर्या असून विशाल चौथर्यावर चार मोठी कलात्मक उपमंदिरे असल्याने हे पंचायतन शैलीतील मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर रथात बसलेल्या सुर्यनारायणाची सुंदर प्रतिमा आहे. गर्भगृह प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस विष्णूंचे द्वारपाल जय आणि विजय यांच्या सुरेख मूर्ती आहेत. गाभार्यात भगवान विष्णूंची चतुर्भुज मूर्ती आहे. या मूर्तीला ३ मुखे असून ती अनुक्रमे नरसिंह, विष्णू व वराह यांची आहेत. परिक्रमा मार्गावर फिरताना विविध शिल्पकृती रेखाटलेल्या आहेत. या शिल्पकृतींमध्ये राजघराण्यातील विविध प्रसंग, हातात हस्त घेऊन शिकरीला निघालेले घोडेस्वार, विवाह प्रसंग, धर्मोपदेश करणारे धर्मगुरू, युध्द प्रसंग, इत्यादी विविध प्रसंग रेखाटलेले आहेत. या मंदिराच्या दोन्ही बाजूस भव्य व रेखीव कामशिल्पे आहेत.
लक्ष्मण मंदिराच्या समोर काही अंतरावर उंच चौथर्यावर एक प्रचंड वराहाचे स्वतंत्र मंदिर आहे. वराह अवतार हा विष्णूच्या अनेक अवतारापैकी एक मानला असल्याने याचे स्वतंत्र मंदिर आढळते. या मंदिरात २-६ मीटर लांब व १-८ मीटर उंचीचा हा वराह विलक्षण देखणा व रेखीव आहे. या वराहमूर्तीच्या शरीरावर विविध अशा एक ७६४ मूर्ती रेखाटल्या आहेत. मंदिराच्या छतावर सहस्त्रदलांनी युक्त कमळ कोरलेले आहे.
पश्चिम मंदिर समूहाच्या उत्तर टोकावर प्रसिध्द 'विश्वनाथ मंदिर' आहे. या मंदिराला १२ पायर्या असून हे मंदिर भव्य चौथर्यावर इ.स. १००२ च्या सुमारास राजा धंगदेव यांनी उभारले आहे. ३० मीटर लांब व १५ मीटर रूंदीच्या या चौथर्याच्या जिन्याच्या दोन्ही बाजूंना वाघ आणि हत्ती यांची सुंदर शिल्पे आहेत. मंदिराच्या समोर नंदीचे स्वतंत्र मंदिर आहे. या मंदिरातील भव्य दोन मीटर उंचीची नंदीची मूर्ती प्रेक्षणीय आहे. चौथर्यावरील चौदा दगडी पायर्या चढून गेल्यानंतर मुख्य मंदिरात प्रवेश होतो. तेथे दोन्ही बाजूस श्रीगणेश व वीरभद्र यांच्या सुंदर मूर्ती आहेत. मंदिरामध्ये चामुंडा, इंद्राणी, वराही, वैष्णवी यांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. मंदिराच्या बाह्यबाजूला नृत्य, संगीत, उत्सव, मिरवणूका यांची शिल्पे कोरलेली आहेत. गर्भगृहात चौकोनी आकारातील शिवपिंड आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस विविध शिल्पाकृती आढळून येतात. त्यामध्ये नृत्य करणारा गणेश, पायातील काटा काढणारी सुंदरी, वाद्य वादन करणारी अप्सरा इत्यादी शिल्पे लक्षणीय आहेत. गर्भगृहाच्या बाहेरील बाजूस भव्य व रेखीव कामशिल्पे आहेत.
पश्चिम मंदिर समूहाच्या मागील बाजूस भव्य व रेखीव असे 'कंदारिया महादेव मंदिर' आहे. हे मंदिर या समुहातील सर्वात भव्य व प्रमुख मंदिर आहे. या मंदिराचा निर्माणकाळ हा इ.स.१०२५ ते १०५० आहे. या मंदिरास १४ पायर्या असून मंदिरांची उंची तब्बल ३१ मीटर आहे. मंदिराची एकावर एक चढत जाणारी ३ शिखरे लक्षवेधक आहेत. प्रवेशद्वारावर नृत्य करणार्या अप्सरा, व्याल इत्यादींची शिल्पे आहेत. या मंदिराच्या आतील बाजूने २२६ शिल्पाकृती व बाहेरील ६४६ शिल्पकृती कोरलेल्या आहेत. त्यामध्ये किन्नर, देवदेवता, यक्ष, नृत्याप्सरा इत्यादी शिल्पकृती आहेत. तसेच भव्य व कोरीव मिथुनशिल्पे लक्षवेधक आहेत. गर्भगृहात एक रेखीव शिवपिंड आहे. मंदिराच्या समोरील कोपर्यात एक सुंदर शिल्प साकारले आहे. त्यामध्ये राजा चंद्रवर्मन एका मोठ्या सिंहाशी झुंज घेताना दाखविला आहे.
कंदारिया महादेवाच्या चौथर्याला जोडूनच जगदंबा देवी मंदिराचा उत्तुंग चौथरा आहे. या मंदिरात पार्वतीची मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे. या मंदिराच्या बाह्यभागावर विविध शिल्पाकृती रेखाटल्या आहेत. त्यामध्ये आरशात स्वत:ची प्रतिमा न्याहाळणारी सुंदरी, शरमेने डोळ्यावर हात झाकलेली सुंदरी, डोळ्यात अंजन घालणारी अप्सरा इत्यादी शिल्पे लक्षवेधक आहेत.
जगदंबादेवी मंदिराच्या शेजारी, 'चौसष्ठ योगिनी मंदिर' असून हे मंदिर उत्तराभिमुख आहे. हे मंदिर ग्रॅनाईटच्या दगडात बांधलेले असून हे एक पुरातन मंदिर आहे. मंदिरात महिषासुरमर्दिनीची रेखीव मूर्ती आहे. या मंदिरानंतर 'चित्रगुप्त मंदिर' हे या रांगेतील शेवटचे मंदिर आहे. हे मंदिर इ.स.१००० ते १०२५ दरम्यान उभारले असून भव्य व रेखीव आहे. या मंदिरात सूर्यदेवाची दोन मीटर उंचीची भव्य मूर्ती आहे. त्याच्या शेजारी चित्रगुप्ताची खंडीत झालेली मूर्ती आहे. मंदिराच्या बाह्य भागावर विविध आकर्षक व रेखीव शिल्पे आहेत. त्यामध्ये प्रेमीयुगुलांच्या विविध आलिंगनांची रेखीव शिल्पे आहेत.
पश्चिमी मंदिर समूहाच्या बाह्यबाजूस 'मातंगेश्वर मंदिर' हे भव्य मंदिर आहे. या मंदिरात महादेवाची सुमारे ७.२ मीटर व्यास व अडीच मीटर उंच अशी भव्य पिंड आहे. या मंदिराच्या भव्य चौथर्यावरून पश्चिम मंदिर समूहाचे विलोभनीय दर्शन घडते.
पूर्वमंदिर समूहामध्ये जैन मंदिरांच्या अंतर्भाव होतो. त्यामध्ये पार्श्वनाथ, आदिनाथ व शांतिनाथ यांची मंदिरे प्रेक्षणीय आहेत. ही सर्व मंदिरे दिगंबर जैन पंथांची असून एकाच प्रांगणात आहेत. या मंदिरापासून काही अंतरावर 'घंटाई मंदिर' आहे. जैन मंदिरांप्रमाणेच तीन हिंदू मंदिरांचाही अंतर्भाव पूर्वमंदिर समूहात होतो. त्यामध्ये ब्रह्मा, वामन आणि जवारी मंदिरांचा समावेश होतो.
खजुराहोचा दक्षिण मंदिरसमूह हा गावापासून सुमारे ५ कि.मी. अंतरावर आहे. यामध्ये दुल्हादेव व चतुर्भुज मंदिरांचा समावेश होतो. 'दुल्हा देव मंदिर' हे खुदर नदीच्या जवळ स्थित आहे. या मंदिराच्या गर्भगृहातील मोठ्या शिवलिंगावर १००० कोटी शिवलिंगे कोरलेली असल्याने त्यास सहस्त्रमुखी शिवलिंग असेही म्हणतात. 'चतुर्भुज मंदिर' हे छोटेखानी मंदिर असून गर्भगृहात २.७ मीटर उंचीची शिवमूर्ती आहे. मंदिराच्या दक्षिण बाजूस अर्धनारीनटेश्वर व उत्तरेकडे नरसिंहाची शिल्पे आढळून येतात. या मंदिरात कामशिल्पांचा अभाव आहे.
खजुराहोच्या सर्व मंदिरांची रचना काहीशी सारखी आहे. वास्तुशिल्पकलेच्या दृष्टीकोनातून ही मंदिरे अप्रतिम असून यांची रचना तत्कालीन इतर मंदिरांपेक्षा भिन्न आहे. मंदिरांची शिखरे भव्य असून निमुळती होत गेलेली आहेत. मंदिरांची अंतर्गत रचनाही सारखीच आहे. प्रत्येक मंदिर हे उंच व प्रशस्त अशा चौथर्यावर स्थित आहे. मंदिराचे प्रवेशद्वारही उंचावर असून प्रवेशद्वारापाशी सुंदर मकरतोरणे आहेत. मंदिराचे अर्धमंडप, मुख्य सभामंडप, अंतराळ व गर्भगृह असे भाग आहेत. मंदिर अंतर्भागामध्ये अनेक शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. स्तंभाच्या वरच्या बाजूस 'मदालसा' नामक सुंदर स्त्रीप्रतिमा कोरलेल्या आहेत. मंदिराच्या तीन प्रमुख विभागांवर तीन विभिन्न शिखरे आहेत. गर्भगृहाचे शिखर हे सर्वोच्च शिखर असून त्यानंतर क्रमश: इतर शिखरे येतात.
'मंदिराच्या बाह्य दर्शनी भागावर विविध आकर्षक शिल्पाकृतींची रेलचेल आढळून येते. स्त्रीसौंदर्याचे विविध पैलू या शिल्पाकृतींमधून दृष्टोत्पत्तीस येतात. यामधील प्रत्येक शिल्प रेखीव व लक्षवेधक आहे. स्त्रीशिल्पांमधील विविध अवयव अत्यंत रेखीव आहेत. स्त्रीसौंदर्याचे सर्व मापदंड या शिल्पाकृतींना लागू पडतात. शिल्पाकृतींच्या चेहर्यावरील विविध भावभावना बारकाईने रेखाटलेल्या आहेत.
कामशिल्पे ही सर्व शिल्पाकृतींमध्ये अधिकच उठावदार ठरली आहेत. किंबहुना कामशिल्पे हीच या शिल्पाकृतींची खरी ओळख ठरली आहेत. या कामशिल्पांच्या ओढीने देशविदेशातील लाखो पर्यटक खजुराहोकडे धाव घेतात. वात्स्यायनाच्या कामशास्त्रातील विविध कामासनांचा अंतर्भाव या कामशिल्पांमध्ये केलेला आढळून येतो. स्त्रीमैथुन, हस्तमैथुन, मुखमैथुन, गुदमैथुन, पशुमैथुन, समूहमैथुन इत्यादी कामशास्त्रातील विविध मैथुन प्रकार या काम शिल्पांमध्ये सढळ हाताने रेखाटलेले आहेत. येथील बहुतेक सर्व मंदिरांच्या बाह्यभिंतीवर कामशिल्पे आढळून येतात. लैंगिक संबंधाचा परमोच्चबिंदू (Orgasm) गाठणारे मैथुन शिल्प तर विशेष उल्लेखनीय आहे. सौंदर्याने नटलेली स्त्री पुरूष देहाची ही कामशिल्पे तत्कालीन समाजजीवनाचा एक भाग समजली जातात. ही कामशिल्पे असली तरी त्यामध्ये कोठेही अश्लीलता, बीभत्सपणा आढळून येत नाही. ही कामशिल्पे जीवनातील कामभावनेचे महत्त्व अधोरेखित करतात. म्हणूनच खजुराहोची कामशिल्पे ही संपूर्ण जगाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली आहेत.
खजुराहोची कामशिल्पे पाहिल्यानंतर आणि कामशिल्पातील उच्च कोटीची कलात्मकता अनुभवल्यानंतर पाहणार्याच्या मनात हीन पातळीवरील कामोत्तेजक भावना निर्माण होणे शक्यच नाही. या कामशिल्पांना अश्लील (Vulgar) संबोधणे म्हणजे संकुचित, बुरसटलेल्या मनोवृत्तीचे लक्षण आहे. खजुराहोतील कामशिल्पात आढळणार्या चुंबन, आलिंगन, समागम इत्यादी गोष्टीकडे पाहताना उच्च अभिरूची, सुसंकृत विचारसरणी व होकारात्मक दृष्टीकोन असणे आवश्यक आहे. अन्यथा त्या कामशिल्पातील अप्रतिम सौंदर्य आपणास दिसणार नाही. त्यामध्ये आपणास केवळ अश्लीलता व बीभत्सता दिसून येईल. कामशिल्पांचा अभ्यास करीत असताना तत्कालीन जीवनात कामशास्त्राचे महत्व काय होते. याचा मागोवा घेणे प्रस्तुत ठरेल. त्याकाळी इतर शास्त्राबरोबरच कामशास्त्राचीही सुरूवात होऊन मानवी संस्कृतीच्या प्रगतीला हातभार लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. वात्स्यायनाचे कामसूत्र, कोकापंडिताचे रतिरहस्य, कल्याणमल्लाचे अनंतरंग, हरिहराची शृंगारदीपिका, नागार्जुनाचे रतिशास्त्र इत्यादी कामशास्त्रावरील ग्रंथ प्रसिध्द आहेत. याशिवाय काम व्यवहाराचा उल्लेख ऋग्वेद, अथर्ववेद इत्यादी प्राचीन ग्रंथांमध्येही आढळून येतो. प्राचीन काळापासून कामशास्त्राला मानवी जीवनात किती महत्त्व होते, हे प्रस्तुत संदर्भावरून स्पष्ट होते. मानवी देहाचे नैसर्गिक व्यवहार व व्यापार काय आहेत, शरीरवासना कशा पूर्ण कराव्यात, कामव्यवहाराची परिचर्या, गर्भसंभवानंतर होणारी गर्भवृध्दी यांचे शास्त्रीय विवेचन तत्कालीन ग्रंथामध्ये केलेले आढळून येते.
तत्कालीन लोकांना मैथुनाविषयी घृणा नव्हती. प्रणयक्रिडा, संभोगक्रिया या तनुमनाला उल्हासित करणार्या व जीवन समृध्द करणार्या क्रिया आहेत असे त्यांचे मत होते. स्त्री-पुरूष संबंध आणि त्या संबंधांच्या कलात्मक आकृती या सुंदर, पवित्र व उदात्त आहेत, अशी तत्कालीन समाजधारणा होती. खजुराहोतील कामशिल्पे ही कामुक विचार निर्माण करण्यासाठी केलेली असावीत, असाही एक मतप्रवाह आहे. मात्र ही कामशिल्पे मंदिराच्या केवळ बाह्यभागी कोरलेली आहेत. मंदिरात प्रवेश करणार्या भक्ताला प्रथम ही कामशिल्पे दिसतात. या कामशिल्पाने तो आकर्षित झाला किंवा त्याच्या मनात कामवासना निर्माण झाली तर आतील गाभार्यात जाऊन देवदेवतांची पूजा करण्यापूर्वी मन शांत करणे आवश्यक आहे. इंद्रियनिग्रहाची परीक्षा घेण्यासाठीच बहुधा ही कामशिल्पांची योजना मंदिर परिसरात केलेली असावी. परमेश्वराबद्दल ज्यांना आस्था नाही किंवा जे नास्तिक आहेत, त्यांनी मंदिरामध्ये यावे यासाठी कामशिल्पे केलेली असावीत, असे एक मत प्रचलित आहे. संसारात गुरफटलेल्या व्यक्तीला आपल्या वासनामय जीवनाचे आकर्षण कमी होऊन त्याचे लक्ष्य अध्यात्माकडे वळावे यासाठी सर्वसामान्य माणसाला आकर्षित करणारी ही कामशिल्पे मंदिराच्या बाह्य भागावर कोरलेली असावीत. खजुराहोच्या कामशिल्पांचा आणखी एक हेतू म्हणजे तत्कालीन तरूणतरूणींना लैंगिक शिक्षण मिळावे हा होय. ही कामशिल्पे म्हणजे वात्सायनाने आपल्या कामसूत्रात वर्णन केलेल्या विविध कामव्यवहाराचे प्रदर्शनच होय. तत्कालीन युवकांना लैंगिक ज्ञानाची प्राथमिक व प्रात्यक्षिक माहिती व्हावी यासाठी ही कामशिल्पे मंदिराच्या परिसरात रेखाटलेली असावीत. लैंगिक व्यवहारासंबंधी गुप्तता राखली गेल्याने कुतुहल वाढते. हे कुतुहल शमविण्यासाठी लैंगिक शिक्षण आवश्यक ठरते. त्यासाठीच या कामशिल्पांचे प्रयोजन असल्याचे आढळून येते.